प्रभाकर वृत्तपत्र

प्रभाकर

संस्थापक गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन
सुरुवात २४ ऑक्टोबर १८४१
मुख्यालय मुंबई

 

जुन्या पिढीकडून स्वराज्य रक्षणार्थ इंग्रजांशी झालेल्या झटापटीच्या गोष्टी ऐकता ऐकता इंग्रजी शाळेत जाऊन नवनवीन गोष्टी शिकणारी नवी पिढी महाराष्ट्रात तयार होत होती. या पिढीने जन सामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी वृत्तपत्राला हाताशी धरले व इंग्रज, स्वकीय यांच्यावर परखड टीका करण्यास सुरुवात केली. या पिढीचे विचार ‘प्रभाकर’ पत्रात पहावयास मिळतात.

प्रखर तेजस्वितेचे सूचक “प्रभाकर” हे नांव घेऊन २४ ऑक्टोबर १८४१ ला मुंबईत गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन यांनी प्रभाकर पत्र सुरू केले.

एक तावी शिळा छापावर छापल्या जाणाऱ्या प्रभाकरचा आकार ११ द ९ इंच होता. वार्षिक वर्गणी त्या काळाच्या मानाने जरा जास्त म्हणजे वार्षिक १२ रु. होती. भाऊ महाजन यांनी प्रभाकर व धुमकेतू या दोन पत्रांतून आपल्या आक्रमक पण विवेकी पत्रकारितेचे कौशल्य प्रकट केले आहे. प्रभाकरने आपल्याला संस्कृतीविषयी, भाषेविषयी, स्वाभिमानदर्शक लेख दिले आहेत. पुनर्विवाहासारख्या प्रश्‍नावर तर प्रभाकरातील लेख आजही वाचण्यासारखे आहेत.

प्रभाकरातील मजकूर जामेजमशेद, ज्ञानोदय, मुंबई विटनेस, युनायटेड सर्विस गझेट, इंग्लिशमॅन, आग्रा अखबार, बंगाल हरकारू वगैरे पत्रांवरून घेतलेला असे. तसेच वाचकांची पत्रे, सरकारी गॅझेटवरून, नेमणुका, बदल्या, जहाजांची वेळापत्रके या बरोबरच प्रभाकरात वैचारिक लेख, माहिती असे.

कर्मठ सनातनी रूढीग्रस्त वर्ग व नवविद्या विभूषित सुशिक्षित वर्ग या दोन्ही टोकांचा ‘प्रभाकर’ने पुरस्कार केला नाही तर प्रभाकरचा मार्ग दोहोच्या मधला दिसतो. पाश्चात्य विद्येच्या आदराबरोबरच भारतीय संस्कृती भाषा यांचा स्वाभिमान प्रभाकरच्या लेखात दिसून येतो.

सामाजिक इतिहासाच्या अभ्यासकाला प्रभाकरने दिलेला अमोल ठेवा म्हणजे प्रभाकरात प्रसिद्ध झालेली लोकहितवादींची शतपत्रे. सरदार गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांची सुप्रसिद्ध `शतपत्रे’ प्रथम  प्रभाकर पत्रातच प्रसिद्ध झाली. १९ मार्च १८४८ या दिवशी पहिले पत्र प्रसिद्ध झाले. शतपत्रांनी प्रभाकराला वृत्तपत्रसृष्टीत अजरामर करून ठेवले आहे. सामाजिक बाबतीतील प्रश्नांवरील लेखांद्रारे प्रभाकराने १९ व्या शतकात दाखविलेले मनोधैर्य आणि सडेतोड लेखन आजही स्तुतिपात्र आहे.

एकाच वेळेला प्रभाकर, धुमकेतू, ज्ञानदर्शन अशी विविध नियतकालिके चालविणारे, पूर्णवेळ वृत्तपत्र व्यवसाय स्वीकारून तो यशस्वी करणारे भाऊ महाजन हे पहिलेच मराठी पत्रकार होत. धार्मिक, राजकीय, सामाजिक या तीनही क्षेत्रावरील त्यांचे लेख मननीय आहेत. अशा मोठमोठ्या प्रश्‍नांचा उहापोह करणाऱ्या भाऊ महाजनांचे समाजातील लहान सहान गोष्टींकडेही कसे लक्ष होते हे धूमकेतू मधील ‘कुटुंबातील सुधारणूक, वस्त्रांचा उपयोग’ हा लेख वाचून समजते. धूमकेतूच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू लोक वस्त्रे खरेदी करण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. त्यांना सोन्याचे दागिने खरेदी करण्याची हौस आहे. परंतु वस्त्रे ही एक उपयोगी व गरजेची वस्तू आहे हे लक्षात घेत नाहीत. चांगले कपडे न वापरल्यामुळे घरातील लहान थोर सर्वांनाच किती त्रास होतो, आजार होतो याची विस्तृत चर्चा या लेखात केली आहे, अनेक वैद्यांचे दाखलेही दिले आहेत, पारशी,शेणवी, प्रभू, इंग्रज यांची बायका-मुले किती व्यवस्थित कपडे घालतात हे सांगून संपादक सांगतात की, “ज्या मुलाच्या हातात हा धूमकेतू जाईल त्यानी आपल्या आईस व बहिणीस हे पत्र वाचून दाखवावे म्हणजे कदाचित ईश्वर कुपेने कित्येक अव्यवस्थित कुटुंबात या माझ्या अल्प व नम्र प्रयत्नाने वस्त्रांच्या उपयोगाविषयी काहीतरी सुधारणूक होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *